Sunday, 6 September 2015

आज दहीहंडी, श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो आहोत. मानवी मनोरा तयार करून एकमेकांच्या साथीने आपण इच्छित उंचीवरील दहीहंडी फोडून हा आनंदोत्सव साजरा करीत असतो. आपले सर्व सण हे आपल्या आयुष्याला उद्बोधक असेच असतात, मला माझ्या जीवनातील इच्छित ध्येय गाठण्यासाठी समूहाबरोबर काम करण्याची कला साध्य झाली पाहिजे, बरोबर असणार्या सर्व सहकार्यांच्या गुणावगुणाच्या अभ्यास करून त्यांच्या कार्याला एक दिशा देऊन कार्याचा मनोरा उभा करता येऊ शकतो,  उत्कट भव्य ध्येय गाठण्यासाठी टीमवर्क, समन्वय, अन परस्पर विश्वास आवश्यक आहे. मानवी जीवन उन्नत दर्जेदार व्हावे हेच आपल्या संस्कृतीचे उदिष्ट आहे. मी माझे कुटुंब, माझा परिवार, माझा परिसर, माझे शहर, माझा देश या सर्वांना उच्चतम यशशिखरापर्यंत नेण्याकरिता आपल्याला प्रेरणा मिळावी हीच सदिच्छा 
श्रावणातील आजचा चौथा सोमवार, देवाधिदेव महादेवाचा वार, या काळात ऑंम नमः शिवाय आणि रुद्र पठणाच्या निनादात शंकराच्या पिंडीवर होणारा पंचामृताचा अभिषेक तन मनाला प्रसन्न करून जातो,या प्रसन्न लहरींमधून माझ्या मनातील ईश तत्व जागृत व्हावे अन मनाच्या गाभार्यात अखंड परमानंद अन समाधान भरून रहावे. पंचमहाभुतांपासून घडलेल्या या शरीराच्या माध्यमातून सभोवतालच्या जीव सृष्टीला काही शाश्वत देता यावे, जीवनामधे मला जे जे काही प्राप्त झाले आहे त्याहून अधिक काही परत देण्याची सुबुध्दी मला व्हावी, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर या उक्तीप्रमाणे माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्वांचे मी काही भले चिंतण्याचा वा करण्याचा प्रयत्न करावा. पाहावे आपणासी आपण हा विचार मनामधे ठेऊन माझ्या मनातील चिंता, द्वेष, असूया, मत्सररुपी काजळी सकारात्मक उर्जेमधे नष्ट होऊन जावी. माझे आरोग्य, समाधान आणि सत्चितानंदरूप टिकून राहावे हीच या जागृत समयी प्रार्थना, शुभ सकाळ - डॅा. पराग काळकर